भारत कोणाच्या बापाचा नाही. भारत हा प्रत्येकाचा आहे. तुम्ही एक पाकिस्तान निर्माण केला. आता भारताचे आणखी किती तुकडे कराल, असा सवाल नॅशलन कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी भाजपला विचारला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी जम्मूत सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मुस्लिम समाजाने भाजपच्या उमेदवारांना मतं दिली तर ते सुखात राहतील. अन्यथा त्यांनी कष्ट झेलण्याची तयारी ठेवावी, असा इशारा उत्तर प्रदेशमधील भाजप नेते रणजीत कुमार श्रीवास्तव यांनी दिला होता. या विधानाचा दाखला देत अब्दुल्ला म्हणाले, मत दिले नाही तर तुम्हाला दाखवून देऊ अशी धमकी ती (भाजप नेते) लोक देतात, पण भारत हा कोणाच्या बापाचा नाही. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन अशा प्रत्येकाचा हा देश आहे. कोणाला मत द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तीलाच आहे, तुम्ही त्यांच्यावर सक्ती करत नाही, असे त्यांनी सांगितले. तुम्ही एक पाकिस्तान तयार केला, आता भारताचे आणखी किती तुकडे कराल, असा सवाल त्यांनी भाजपला केला.

पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा हिस्सा आहे या विधानावर मी अजूनही ठाम आहे. पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाही. त्यांच्याकडेही अणूबॉम्ब आहे. त्यांनी आमची हत्या करावी असे तुम्हाला वाटते का ?, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. तुम्ही महलात राहता, पण सीमारेषेवर राहणाऱ्या गरीब जनतेचा विचार करा, त्यांच्या घरावर रोज बॉम्ब पडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पीओकेबाबत वादग्रस्त विधानांमुळे फारुख अब्दुल्ला हे चर्चेत आले आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा आपला भाग आहे, असे आपण किती दिवस म्हणत राहणार आहोत? पाकव्याप्त काश्मीर हा त्यांच्या बापाच्या मालकीचा नाही, असे विधान त्यांनी नुकतेच केले होते.