जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात जवानांनी दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळला आहे. दहशतवाद्यांना जवानांना लक्ष्य करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील एका पुलाखाली स्फोटकं पेरून ठेवली होती. मात्र, बॉम्ब शोधक पथकाकडून ही स्फोटकं हस्तगत व निष्क्रिय करण्यात आली आहेत. साधरणपणे तीन किलो स्फोटकं दहशतवाद्यांनी पेरून ठेवली होती.

गोंडबल पंजाला राफियाबाद परिसरात दहशतवाद्यांनी जवानांच्या पथकास लक्ष्य करण्यासाठी ही योजना आखली होती. मात्र सुदैवाने कोणताही अनर्थ घडण्याअगोदर हा प्रकार उघडकीस आला.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानसह दहशतवादी संघटनांच्या भारतविरोधी कारवाया मोठ्याप्रमाणवर वाढल्याचे दिसत आहे. पाकिस्तानकडून तर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ल्यांची शक्यता पाहता, या ठिकाणी सुरक्षा अधिकच वाढवण्यात आलेली आहे. याचबरोबर काश्मीरमध्ये जाणाऱ्या अथवा तिथून येणाऱ्या लोकांची तसेच वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.