पुलवामा येथे बॉम्बहल्ल्यात सीआरपीएफचे १० जवान जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दिवसभरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर सहा ठिकाणी हल्ले चढवले. हल्लेखोरांचा मुख्य भर केंद्रीय राखीव पोलीस दलावर (सीआरपीएफ) होता.

पुलवामा जिल्ह्य़ात मंगळवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हातबॉम्ब फेकल्याने १० जवान जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

श्रीनगरपासून ३५ किलोमीटर अंतरावर त्रालजवळील लडियार गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १८०व्या बटालियनचा तळ आहे. मंगळवारी या तळावर हातबॉम्ब फेकून दहशतवादी पळून गेले. त्याच्या स्फोटात १० जवान जखमी झाले. जवानांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू केली, मात्र अद्याप कोणी हाती लागले नव्हते.

गेल्या तीन दिवसांतील अशा स्वरूपाचा हा तिसरा हल्ला आहे. सोमवारी त्राल भागातीलच सीआरपीएफच्या तळावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात दोन जवान जखमी झाले होते. तर रविवारी श्रीनगरमधील सराफ कदाल येथील चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले होते.

मंगळवारच्या दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्य़ातील पडगमपोरा येथे सीआरपीएफच्या तुकडीवर बॉम्ब फेकला. त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

तिसऱ्या घटनेत पुलवामा जिल्ह्य़ातीलच एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब भिरकावला.

चौथा हल्ला अनंतनाग जिल्ह्य़ातील सरनाल भागात झाला. तेथे सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकला.

पाचवी घटना अनंतनाग जिल्ह्य़ातीलच आंचिदोरा येथे घडली. तेथे निवृत्त न्यायाधीश मोहम्मद अथार यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात पोलिसांवर अज्ञातांनी हल्ला करून त्यांच्याकडील शस्त्रे पळवून नेली.

सहाव्या घटनेत दहशतवाद्यांनी कुपवाडा जिल्ह्य़ातील पाझलपोरा येथे २२ राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर गोळीबार केला. लष्करी जवानांनी प्रत्त्युत्तरादाखल हल्ला करताच हल्लेखोर पळून गेले.

या हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. सीआरपीएफने सर्व जवानांना अधिक दक्षतेचे आदेश दिले आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.