जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मांडली. भारताने मानवाधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर बोलताना काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारताविरोधात तथ्यहिन आरोप केले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त तपास समितीची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

कुरैशी यांनी भाजपाच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत त्यामध्ये काश्मीरमध्ये मुस्लिमांना जबरदस्ती अल्पसंख्यांक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं असं सांगितलं. काश्मीरमध्ये स्मशानशांतता असून, तिथे भारताकडून नरसंहार केला जात आहे असा आरोप यावेळी त्यांनी केली. जम्मू काश्मीरध्ये मुलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं जात असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

जम्मू काश्मीरमध्ये सात ते १० लाख सैनिक तैनात असून जगातील सर्वात मोठा कैदखाना असल्याची टीका कुरैशी यांनी केली आहे. काश्मीरमध्ये सहा हजाराहून जास्त नेता, सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलं असल्याचा आरोपा यावेळी त्यांनी केला. यावेळी त्यांनी रोहिंग्या आणि गुजरात दंगलीचा उल्लेख केला. काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर बंद करण्यात यावा आणि कर्फ्यू हटवण्यात यावा अशी मागणी त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे केली.

“भारत काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाला असल्याचा दावा केला आहे. पण मग भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं, संस्थांना जाण्याची परवानगी का देत नाही ? त्यांना माहिती आहे असं केलं तर सत्य जगासमोर येईल”, असं कुरैशी यांनी म्हटलं आहे.