पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. पाकिस्तान सैन्याकडून मंगळवारीही जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनीही पाकिस्तानी सैन्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
#FLASH J&K: Ceasefire violation by Pakistan along LoC in Rajouri sector; Indian Army posts are retaliating; firing is presently on. pic.twitter.com/NmkB4Vo9hW
— ANI (@ANI_news) April 4, 2017
पाकिस्तानी सैन्याकडून उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करण्याची ही दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. राजौरीत नियंत्रण रेषेजवळील भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. तसेच उखळी तोफांचा माराही केला, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही ‘जशास तसे’ उत्तर दिले. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरूच आहे, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला असला तरी, त्यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही, असेही त्यांनी सांगितले. सोमवारीही पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. पूंछ जिल्ह्यातील दिग्वार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 2:00 pm