भाजपचे खासदार नामग्याल यांचे मत

काँग्रेसच्या राजवटीत संरक्षणविषयक धोरणांमध्ये लडाख प्रांताला योग्य तितके महत्त्व देण्यात आले नाही आणि त्यामुळेच चीनने डेमचोकपर्यंतचा प्रदेश काबीज केला, असे मत लडाखचे भाजपचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केले आहे.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर संसदेत प्रभावी भाषण केल्याने नामग्याल प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. तुष्टीकरणाचे धोरण अवलंबून काँग्रेस सरकारने काश्मीरचा विनाश केला आणि त्यामुळे लडाखचे अप्रत्यक्षपणे नुकसान झाले, असेही नामग्याल म्हणाले.

माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनच्या दिशेने इंच इंच सरकण्याचे धोरण ठरविले, मात्र त्याच्या अंमलबजावणीच्या वेळी ते असफल ठरले, चीनच्या सैनिकांनी आपल्या प्रांतात घुसखोरी सुरू ठेवली आणि आपण माघार घेणे सुरू ठेवले, असे नामग्याल म्हणाले.

अक्साई चीन हा पूर्णपणे चीनच्या आधिपत्याखाली असण्याचे तेच कारण आहे, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) डेमचोकपर्यंत पोहोचली कारण काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत लडाखला संरक्षणविषयक धोरणांमध्ये योग्य तितके महत्त्व देण्यात आले नाही, असेही ते म्हणाले.

डेमचोकजवळ भारतीय हद्दीत कालवा बांधण्याच्या भारताच्या कृतीला पीएलएने विरोध केला त्यामुळेच गेल्या वर्षी जुलै महिन्यात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यंदा जुलै महिन्यात चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि डेमचोक प्रांतात घुसखोरी केली.