राजस्थानमधील शालेय पाठ्यपुस्तकांच्या नव्या आवृत्तीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासकट काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख टाळल्याने नवा वाद उत्त्पन होण्याची शक्यता आहे. येथील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात भारताच्या इतिहासाबद्दल देण्यात आलेल्या माहितीत भारताचे पहिले पंतप्रधान कोण याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे पाठ्यपुस्तक अद्याप बाजारपेठेत आले नसले तरी संबंधित प्रकाशनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजपमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. या पाठ्यपुस्तकात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, भगत सिंग, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक हेमू कलानी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसी स्वातंत्र्यसैनिकांचा साधासा उल्लेखही पुस्तकात केलेला नाही. याशिवाय, नथुराम गोडसेकडून महात्मा गांधींच्या करण्यात आलेल्या हत्येचाही उल्लेख पुस्तकामध्ये नाही. राजस्थानच्या माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून अभ्यासक्रम पुर्नरचनेचा भाग म्हणून हे पुस्तक तयार करवून घेण्यात आले आहे. महामंडळाच्या यापूर्वीच्या पुस्तकामध्ये राष्ट्रीय चळवळीशी संबंधित पाठामध्ये नेहरूंचा स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते म्हणून उल्लेख होता. याशिवाय, स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू आणि सरदार पटेल यांच्या योगदानाचा उल्लेखही पुस्तकात होता. मात्र, नव्या पाठ्यपुस्तकात पंडित नेहरूंचा उल्लेख पूर्णपणे टाळण्यात आलेला आहे.