दहावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र वगळून त्या जागी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले असून त्याचा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने निषेध केला आहे. एनएसयूआयचे गोव्यातील प्रमुख अहरझ मुल्ला यांनी सांगितले की, भाजपने पंडित नेहरूंचे छायाचित्र काढून तेथे सावरक रांचे छायाचित्र टाकले आहे.

भाजप इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत असून काँग्रेसचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान पुसण्याचा हा प्रकार आहे. उद्या ते महात्मा गांधी यांचे छायाचित्रही काढतील. काँग्रेसने साठ वर्षांत काय केले असा प्रश्न करतील. इतिहास बदलला जाणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. ‘इंडिया अँड द कंटेम्पररी वर्ल्ड २ – डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स’ या पुस्तकात अलीकडच्या आवृत्तीत हा बदल करण्यात आला असून मागील आवृत्तीत पान क्रमांक ६८ वर नेहरू तसेच  महात्मा गांधी व मौलाना आझाद यांचे महाराष्ट्रातील सेवाग्राम आश्रमातील १९३५ मधील छायाचित्र होते.  नवीन आवृत्तीत नेहरूंचे छायाचित्र काढून त्या जागी सावरकराचे छायाचित्र समाविष्ट केले आहे.