सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्याविरुद्ध हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात जावेद हबीब यांच्या मालकीच्या सलून्सची चेन आहे. त्यांच्या जाहिरातीसाठी काही दिवसांपूर्वी देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. मात्र, या जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे अपमानजनक चित्रीकरण होत असल्याचा आरोप करत हैदराबाद येथील वकील करूण सागर यांनी सईदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या २९५ अ या कलमातंर्गत जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच जावेद हबीब यांना नोटीस पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी हबीब यांच्याकडून अगोदरच लेखी माफीपत्र सादर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

जावेद हबीब यांनी सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रांमध्ये आक्षेपार्ह जाहिराती दिल्या होत्या. जाहिरातीमध्ये हिंदू देवी-देवता हबीब यांच्या सलूनमध्ये आल्याचे दाखवण्यात आले आहे. या जाहिरातींवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. यावरून काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली होती. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला निषेधही नोंदवला होता. त्यानंतर काही वेळातच हबीब यांनी ट्विटरवरून माफी देखील मागितली होती.