Jayanagar Election result : कर्नाटकमधल्या बंगळरू येथील जयानगर मतदारसंघामध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव करत विधानसभेतल्या आपल्या जागांच्या संख्येत एकाची भर टाकली आहे. एकूण 16 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाल्यानंतर काँग्रेसच्या सौम्या रेड्डी या उमेदवाराने भाजपाच्या बी एन प्रल्हाद या उमेदवाराचा 3000 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसला 46 टक्के मते मिळाली तर भाजपाला 33.2 टक्के मतांवर समाधान मानावं लागलं. जेडीएसने ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळेही ही लढत काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी झाली व त्याचा काँग्रेसला फायदा झाला.

मतदारसंघातल्या शिवानंद शर्मा मेमोरियल राष्ट्रीय विद्यालय येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. भाजपाचे उमेदवार बी. एन विजयकुमार यांच्या मृत्यूमुळे कर्नाटक विधानसभेच्या जयानगर मतदारसंघात निवडणूक झाली. एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रल्हाद हे विजयकुमार यांचे भाऊ आहेत, तर सौम्या रेड्डी ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंग रेड्डी यांची मुलगी आहे.

जनता दल (सेक्यलुर) या पक्षाने आपल्या उमेदवाराला 5 जून रोजी माघार घेण्यास सांगितले व काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. जेडीएसच्या कालेगोवडा यांनी मागार घेतल्यामुळे मतविभागणी टळली, काँग्रेस भाजपा यांच्यात थेट लढत झाली व याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.
सोमवारी 11 जून रोजी झालेल्या मतदानात 55 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. राजधानीमधल्या उच्चभ्रू वस्तीत हा मतदारसंघ येत असून 216 मतदार केंद्रांमध्ये मतदान झाले. या मतदारसंघात एकूण दोन लाखांपेक्षा जास्त मतदार असून 1,11,689 मतदारांनी मतदान केले आहे.