बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूच्या जागा कमी झाल्याने एकीकडे नितीश कुमार यांना भाजपा मुख्यमंत्रीपद देणार की नाही यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. दुसरीकडे नितीश कुमार यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळातही अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजपाने बुधवारी दिल्लीत विजयाचं जंगी सेलिब्रेशन आयोजित करताच नितीश कुमार यांनी ट्विट करत मौन सोडलं असून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. “जनता मालक आहे. त्यांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानतो,” असं नितीश कुमार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीमध्ये भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी नितीश कुमार यांनी ट्विट करत आपलं मौन सोडलं.

“मला इशारा देण्याची गरज नाही,” भरसभेत मोदी संतापले; जाणून घ्या नेमकं काय झालं
बिहारमध्ये सत्य आणि विश्वासाचा विजय झालाय – नरेंद्र मोदी

बिहारमधील निकाल एनडीएसाठी आनंदाचा असला तरी नितीश कुमार यांच्यासाठी मात्र चिंतेचा विषय आहे. एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या त्यांना ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख करत जागा वाढणारा भाजपा एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगितलं आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी नरेंद्र मोदीचं सूचक विधान
“बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु,” असं सांगत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.