गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर जाहीरपणे टीका करणारे संयुक्त जनता दलाचे (जदयू) ज्येष्ठ नेते शरद यादव यांना पक्षाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. ‘जदयू’ने शनिवारी त्यांच्याकडून राज्यसभेतील पक्षनेतेपद काढून घेतले. त्यांच्याऐवजी रामचंद्र प्रसाद सिंग यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. जदयूचे बिहार प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही काळात शरद यादव यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करणे गरजेचे होते. आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकलेले नाही. फक्त त्यांच्याऐवजी रामचंद्र प्रसाद सिंग यांची नियुक्ती केली आहे, असे स्पष्टीकरण रामचंद्र प्रसाद सिंग यांनी दिले. ‘जदयू’च्या शिष्टमंडळाने आज यासंदर्भात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी विनंती अर्ज सादर केला.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर आज ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या भेटीबद्दलची माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी नितीश यांच्या जनता दलाला (संयुक्त) भाजपप्रणित रालोआ आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले.

नितीश यांच्या या निर्णयानंतर ‘जदयू’मध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. नितीश यांच्या निर्णयावर पक्षातील वरिष्ठ नेते शरद यादव सुरूवातीपासून नाराज आहेत. मात्र, त्यांची समजूत काढण्याऐवजी, शरद यादव त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली होती. भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी घेतला होता, शरद यादव यांना माझा निर्णय पटला नसेल तर त्यांनी खुशाल स्वतःचा मार्ग निवडावा त्यांना कोणीही थांबवणार नाही असंही नितीशकुमार यांनी सांगितले. तर दुसरीकडे पक्षाचे खासदार अली अन्वर यांनी काल दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.