News Flash

पंतप्रधानपदाचा उमेदवार लवकर ठरवा

भावी पंतप्रधान कोण? या मिलियन डॉलर प्रश्नाचे उत्तर मिळायला अद्याप वर्ष-दीड वर्षांचा कालावधी बाकी असला तरी सत्ताधारी यूपीए आणि रालोआने या प्रश्नाची संभाव्य उत्तरे तयार

| April 12, 2013 01:37 am

भावी पंतप्रधान कोण? या मिलियन डॉलर प्रश्नाचे उत्तर मिळायला अद्याप वर्ष-दीड वर्षांचा कालावधी बाकी असला तरी सत्ताधारी यूपीए आणि रालोआने या प्रश्नाची संभाव्य उत्तरे तयार ठेवली आहेत. रालोआचा घटकपक्ष संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मात्र पंतप्रधानपदाचा दावेदार लवकरात लवकर घोषित केला जावा असा आग्रह धरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याच मुद्दय़ावरील चर्चेला अधिक पसंती दिली जाणार असल्याचे संकेत जेडीयूने दिले आहेत. नरेंद्र मोदींच्या नावाला मात्र जेडीयूचा विरोध कायम असल्याचेच चित्र आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच भाजपचे व पर्यायाने रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे गृहीत धरले जात असतानाच जेडीयूने मात्र त्याला खोडा घालायचे ठरवले आहे. शनिवार, १३ एप्रिलपासून जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येथे बैठक सुरू होत आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार लवकरात लवकर घोषित केला जावा असा आग्रह रालोआकडे धरला जाणार आहे. रालोआचे निमंत्रक शरद यादव यांनीच ही माहिती दिली. नरेंद्र मोदींच्या नावाला जेडीयू विरोध करणार का? या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळताना त्यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असून कोणाचे नाव घोषित करायचे याचा निर्णय अंतिमत रालोआतील सर्व घटक पक्षांच्या सार्वमताने घेतला जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता ही जेडीयूची मुख्य विचारधारा असून त्याचे तंतोतंत पालन करणाराच पंतप्रधानपदाचा प्रबळ दावेदार असू शकतो असे सांगत त्यांनी मोदींच्या नावाला सुप्त विरोधच दर्शवला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वेळोवेळी नरेंद्र मोदींच्या नावाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे जेडीयूकडून मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला सहजासहजी होकार मिळणे कठीण आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत काय होते याचे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधानपदासाठी भाजप आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाचा धोशा लावत आली आहे. मात्र, आता अचानक नरेंद्र मोदींचेच नाव कसे पुढे आले असे एका जेडीयू नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर विचारले. तसेच मोदींना जेडीयूकडून सक्त विरोधच केला जाईल असेही स्पष्ट केले. जेडीयूच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करून एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याचा आग्रह धरला जाईल व त्यानंतरच पुढील रणनीती ठरवली जाईल असेही या नेत्याने बोलून दाखवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:37 am

Web Title: jdu to demand early projection of bjps pm nominee
Next Stories
1 उत्तर कोरियाचे भीती तांडव सुरूच
2 फाशीची शिक्षा रद्द करण्याची देवेंद्रपाल सिंगची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
3 हिंदूीसह २३ भाषा बोलणारा अमेरिकी तरुण!
Just Now!
X