जेईई अॅडव्हान्स -२०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. पुण्याच्या चिराग फलोर या विद्यार्थ्याने देशात जेईई अॅडव्हान्स -२०२०च्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. चिराग फलोर हा मुंबई आयआयटीचा विद्यार्थी आहे. चिरागने परीक्षेत ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या जेईई मेन्सच्या परीक्षेत चिराग १२व्या स्थानी होता. चिरागला १०० पर्सेटाइल मिळाले होते. जानेवारी २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच एका कामगिरीसाठी चिराग फलोरचे कौतुक केले होते.

अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या चिरागला जगातील सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एक असलेल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) अमेरिका येथे अॅडमिशन मिळाले आहे. चिराग हा यावर्षी एमआयटीमध्ये जागा मिळवणाऱ्या भारतातील पाच विद्यार्थ्यांपैकी एक आहे.

“मी चार वर्षांपासून आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे, ही परीक्षा माझ्यासाठी सर्वात कठीण परीक्षा आहे, त्यामुळे मला ही संधी घालवायची नव्हती. जेईईची परीक्षा वेळ कमी असल्याने कठिण असते. एमआयटीची पहिल्या वर्षाची सामान्य परीक्षा जेईईपेक्षा सोपी असते” असे चिरागने एनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

चिरागने या आधीही राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धा जिंकल्या आहेत. खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्रशास्त्र विषयक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये त्यांने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. ट्विटमध्ये पंतप्रधानांनी चिरागला मित्र म्हणून उल्लेख केला होता.

चिरागला अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये संशोधन करायचं आहे. यासाठी त्याने सुरुवातीपासूनच तयारी सुरु केली आहे.