करोनामुळे देशभरातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं असून, अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शाळा व महाविद्यालये बंद असून, आता हळूहळू परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू आहे. दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

जेईई मेन २०२० साठी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना

-करोनामुळे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेतली जाणार आहे. विशेषत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर हजर व्हावं लागणार आहे.

-विद्यार्थ्यांना केंद्रावर येण्यासाठी वेळेचा स्लॉट देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवलं जाणार आहे.

-परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे जेईई मेन २०२० प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत नेण्यास परवानगी नसणार आहे.

-परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

-परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांक असलेल्या आसनावरच बसावं.

-पेपर-२ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे. मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही.

-विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क काम करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे. त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नावं लिहावं, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.

-विद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की, नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच अंगठ्याचा ठसा देखील योग्य पद्धतीनं द्यावा.