सहा महिन्यात जेट पुन्हा भरारी घेईल असा विश्वास या समूहाचे नेतृत्व करणाऱ्या कालरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारी जालान यांनी केला आहे. जेट एअरवेजला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहाने एक कृती आराखडा तयार केला आहे. तर कालरॉक कॅपिटल आणि जालान यांच्या समूहाकाडून जे निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये जेट पुन्हा हवाई सेवा सुरु करेल असं म्हटलं आहे.

जेट २.० मध्ये जेटला तिचे जुने वैभव पुन्हा एकदा प्राप्त करुन दिलं जाणार आहे. जेट एअरवेजचे हवाई मार्ग, स्लॉट पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने वापरले जाणार आहेत. आमच्या कृती आराखड्याला राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद आणि इतर आवश्यक परवानग्या निर्धारित वेळेत मिळाल्या तर जेट एअरवेज उन्हाळी सुट्टीत झेप घेईल असा विश्वास गुंतवणूकदारांच्या समूहाने व्यक्त केला आहे.

आमची सरकारसोबत सुरु असलेली चर्चा ही खूपच सकारात्मक झाली आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास वाटतो आहे की एप्रिल २०२१ पर्यंत आमच्या विमानांनी आकाशात भरारी घेतली असेल. एप्रिल २०१९ मध्ये आर्थिक डबघाईमुळे जेट एअरवेजची उड्डाणं पूर्ण बंद झाली. आता जेट पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे असंही समूहाने म्हटलं आहे.

जेट एअरवेजने २५ वर्षे सेवा दिली. या प्रदीर्घ सेवेत कंपनीने हवाई क्षेत्रात आपलं एक नाव आणि एक वेगळं स्थान प्रवाशांच्या मनात तयार केलं आहे. या कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागल्याने या कंपनीची उड्डाण सेवा एप्रिल २०१९ मध्ये पूर्णपणे बंद करण्यात आली. आता आम्ही नव्या जोमाने भरारी घेऊ असा विश्वास ही कंपनी चालवणाऱ्या समूहाने व्यक्त केला आहे.