लंडनहून मुंबईस येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा संपर्क अध्र्या तासासाठी खंडित झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, मलेशियाचे विमान बेपत्ता झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी ही घटना घडली. जेट एअरवेजचे विमान जर्मनीच्या हवाई हद्दीतून उड्डाण करीत असताना संपर्क खंडित झाला होता. त्यामुळे संबंधित यंत्रणांमध्ये घबराट पसरली.
 ही घटना घडल्यानंतर तिचे गांभीर्य लक्षात घेऊन बोईंग ७७७-३००ईआर जातीच्या विमानातील दोघाही वैमानिकांना पुढील विमानाच्या उड्डणापासून रोखण्यात आले आहे. सदर विमानाची प्रवासी नेण्याची क्षमता ३१२ असली तरी त्यामधून नेमके किती प्रवासी प्रवास करीत होते, हे स्पष्ट झाले नाही.  
या प्रकरणी भारतीय हवाई प्राधिकरण महामंडळाने चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. या वैमानिकांनी आपले हेडसेट काढून टाकल्यानंतर ध्वनिक्षेपकांचा आवाज वाढविल्यामुळे संपर्कात अर्धा तास अडथळे आले होते. आपले हेडसेट दूर केल्याचे वैमानिकांनी अधिकृतरीत्या मान्य केल्याचे सांगण्यात आले.  
नियंत्रण कक्षास प्रतिसाद नाही
जर्मनीच्या हवाई हद्दीतून सुमारे ३० मिनिटे या विमानाचा प्रवास सुरू असताना दोन्ही वैमानिकांनी जर्मन हवाई नियंत्रण कक्षाकडून साधलेल्या संपर्कास कोणताही प्रतिसाद दिला नाही. या गंभीर प्रकाराची चौकशी सुरू असताना या दोघाही वैमानिकांना दोन आठवडय़ांसाठी बाहेर ठेवण्यात आले होते.
घटनेच्या चौकशीचे आदेश
सदर घटना घडल्यामुळे जर्मनीच्या हवाई नियंत्रण कक्षात घबराटीचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी नागरी हवाई उड्डयन विभागाच्या संचालकांकडे या प्रकरणी तक्रारही नोंदविली. त्याचवेळी, जेट एअरवेजच्या कायमस्वरूपी चौकशी मंडळानेही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.