चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादवांचा जामिन अर्ज झारखंड उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. सीबीआय कोर्टानं लालू प्रसाद यादवना देवघर खजिन्याशी संबंधित चारा घोटाळ्यात दोषी ठरवत साडे तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 23 डिसेंबर 2017 पासून ते तुरुंगात आहेत. याखेरीज आणखी दोन घोटाळ्यांमध्येही ते दोषी आढळले असून त्यांना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूण सहा चारा घोटाळ्यांमध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून अन्य प्रकरणी कोर्टांमध्ये सुनावणी शिल्लक आहे.

लालू प्रसाद यादवांवर चारा घोटाळाप्रकरणी तीन खटले दाखल झाले होते. त्या तिनही प्रकरणी त्यांना 2013, 2017 व 2018 मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि अनुक्रमे पाच, साडेतीन व पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. देवघर खजिन्यातून 1991 ते 1994 या कालावधीत 89.27 लाख रुपये बेकायदेशीररीत्या काढल्याचा आरोप सिद्ध झाला आणि चारा घोटाळाप्रकरणी सहभागाबद्दल त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली.

सध्या राचींमधल्या बिरसा मुंडा जेलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख असलेल्या लालू प्रसादना ठेवण्यात आले आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा करत त्यांनी या शिक्षेविरोधात दादही मागितली आहे तसेच जामिनासाठी अर्जही केला होता. पहिल्यांदा 2013 मध्ये दोषी आडळल्यानंतर लालू प्रसाद यादव लोकसभेसाठी अपात्र ठरले तसेच त्यांना निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली. एकूण सहा घोटाळा प्रकरणी लालूंवर खटला भरण्यात आला असून काही प्रकरणांची सुनावणी कोर्टामध्ये शिल्लक आहे.

या वर्षी जानेवारी 24 रोजी लालूप्रसाद यादवना एका चारा घोटाळाप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. चैबासा जिल्ह्याच्या खजिन्यामधून 1992-93 मध्ये 33.67 कोटी रुपये बेकायदेशीररीत्या काढल्याचा त्यांच्यावर आरोप होता, ज्यात ते दोषी आढळले. लालूप्रसाद यादवांसह एकूण सुमारे 15 जणांना विविध घटल्यांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.