जम्मू-काश्मीर सरकारने मंगळवारी एक पत्रक जारी करून  कायदा व सुव्यवस्था राबवताना सुरक्षा दलांना लोकांशी संवेदनशीलपणे वागण्याचा सल्ला दिला आहे.लष्कराच्या जवानांनी एका गर्भवती महिलेस तपास नाक्यांवर दोनदा अडवल्याने रस्त्यातच मुलास जन्म देण्याची वेळ तिच्यावर आली, या असंवेदनशीलतेमुळे सरकारवर असे परिपत्रक जारी करण्याची वेळ आली.
काश्मीरचे विभागीय आयुक्त शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, आम्ही आजच सुरक्षा संस्थांसाठी एक परिपत्रक जारी केले असून नागरी व पोलीस प्रशासनाने सामान्य लोकांशी संवेदनशीलपणे वागावे व त्यांची विनाकारण छळवणूक करू नये असे त्यात म्हटले आहे. वृद्ध व्यक्ती, विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांना ओळखपत्र तपासून त्यांना ज्या ठिकाणी जायचे असेल तेथे जाऊ द्यावे असेही परिपत्रकात म्हटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष करून आरोग्य, अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची अडवणूक करू नये त्यांना त्यांची सेवा पार पाडू द्यावी असेही त्यात म्हटले आहे.
उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्य़ात एका महिलेने रस्त्यात बाळाला जन्म दिला असता लष्कराने तिला रुग्णालयात जाण्यापासून रोखले होते त्या पाश्र्वभूमीवर हे पत्रक काढण्यात आले आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला की, कुकरुसा येथे शोधमोहीम राबवणाऱ्या सैनिकांनी या महिलेला दोन नाक्यांवर तासभर अडवून ठेवले. त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यास विलंब झाला. कुमार यांनी सांगितले की, ही घटना असंवेदनशीलतेचे लक्षण असून ती टाळता आली असती. आपण फार असंवेदनशील बनत आहोत व ते टाळले पाहिजे. जवानांना मानवी संवेदनशीलतेचे प्रशिक्षण लष्करी अधिकाऱ्यांसारखे दिलेले नसते त्यामुळे आपण त्यांनी केलेल्या या कृत्यास संशयाचा फायदा देतो कारण तेथे लष्कराचा कुणीही अधिकारी उपस्थित नव्हता.