भारत-पाकिस्तान सीमेवर जम्मूजवळ पाकिस्तानी सैनिकांनी १५ लष्करी चौक्या आणि काही लहान गावांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) फौजांनीही पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या काही छावण्यांवर गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
जम्मू जिल्ह्यातील अर्निया आणि आर. एस. पुरा या परिसरातील लष्करी चौक्यांना पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष्य केले. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात गोळीबार करण्यात आला, अशी माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली. सीमेवर असलेल्या काही लहान गावांवरही पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला. या गावांतील तीन जण जखमी झाले असून, चिंताजनक असलेल्या एकाला जम्मूतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.
दोडा, जंगल वन, जंगल टू, क्रांती, शेर आणि शक्ती या सहा लष्करी चौक्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात काही चौक्यांचे नुकसान झाले आहे, तर हल्ला झालेल्या गावांमधील पाच घरांचे नुकसान झाले, तर एका घराला आग लागली होती.