महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून केली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यातही शिवसेनेकडून याबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्यातून जम्मू-काश्मीर शिवसेनेने आदर्श घेतला असून जम्मूमध्ये गरजू लोकांसाठी दहा रुपयांत ‘साहेब खाना’ योजनेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.

शिवसेनेकडून ‘साहेब खाना’ योजनेला सुरूवात झाली असून सध्या जम्मू येथील शिवसेना भवनात केवळ या सेवेचा लाभ घेता येईल. लवकरच १० रुपयांमध्ये भरपेट जेवणाची ही योजना जम्मूच्या राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल व जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर देखील सुरूवात होईल. याशिवाय जम्मूतील बक्षी नगर आणि शालिमार रुग्णालयातही ही सेवा लवकरच सुरू केली जाईल. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिली आहे. दरदिवशी प्रत्येक व्यक्तीला ‘साहेब खाना’ थाळीमध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी असे पदार्थ दिले जात आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करून एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी केली जाणार, अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून पाडला होता.