जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रमात सामील असलेला आरोपी कन्हैयाकुमार याला न्यायालयात हजर केले जात असताना त्याच्यासह पत्रकार तसेच विद्यार्थ्यांना पतियाळा न्यायालयात मारहाण करणाऱ्या वकिलांनी समन्स धुडकावले आहे. विक्रम सिंह चौहान व इतर दोनजणांनी न्यायालयात हजर होणे अपेक्षित होते, पण त्यांनी समन्स धुडकावून सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात हजेरी लावली. चौहान व त्यांच्या साथीदारांची छायाचित्रे प्रसारमाध्यमात आली आहेत. त्यांचा कारकरडुमा न्यायालयाच्या परिसरात सत्कार करण्यात आल्याचे समजते. दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी हे पतियाळा न्यायालयात कायदा व सुरक्षा व्यवस्था राखण्यात कमी पडल्याचे आरोप आहेत, पण त्यांनी मात्र पोलीस दलाने केलेले प्रयत्न पुरेसे होते असे म्हटले आहे. देशाची एकात्मता राखण्यासाठी तसेच वकिलांवरील अन्यायाविरोधात हा मेणबत्ती मोर्चा काढला असे वकिलांनी म्हटले आहे. दिल्ली जिल्हा न्यायालय बार असोसिएशनने इंडिया गेट येथे शुक्रवारी देशविरोधी लोक व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी कारवाया तसेच वकिलांना बळीचा बकरा केले जात असल्याबाबत निषेध मोर्चा काढला होता.