दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’तील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्यांचीच सत्ता आली असून एआयएसए, एसएफआय, एआयएसएफ, डीएसएफ या डाव्या संयुक्त आघाडीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागांवर विजयी पताका फडकावली. राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या जेएनयूमधील या निवडणुकीत डावे विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अशा या दुरंगी लढतीने विद्यापीठ आवारातील वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले होते.

या निवडणुकीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय)च्या आइशी घोष हिची अध्यक्षपदी निवड झाली. मूळ पश्चिम बंगालच्या आइशीला २३१३ मते मिळाली, आईशीने अभाविपच्या मनीष जांगीडचा पराभव केला. मनीषला ११२८ मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्राच्या एका तरुणानेही आपली छाप सोडली. मूळ नागपूरच्या साकेत मून याची उपाध्यक्षपदी निवड झाली. डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन(डीएसएफ)च्या साकेतने अभाविपच्या श्रुती अग्निहोत्रीचा पराभव केला. साकेतला सर्वाधिक ३३६५ मते मिळाली. श्रुतीपेक्षा दुप्पटीहून अधिक मते मिळवत साकेतने विजय मिळवला. श्रुती हिला १ हजार ३३५ मते मिळाली.

(विजयानंतर जल्लोष करताना साकेत मून आणि आइशी घोष, PC : Tashi Tobgyal)

ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (एआयएसएफ) सतिश चंद्र यादवची सचिवपदी निवड झाली. त्याने अभाविपच्या सबरीश पीए याचा पराभव केला. सतिशला २५१८ मते मिळाली तर, सबरीशला १ हजार ३५५ मते मिळाली. ३२९५ मते मिळवून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (एआयएसएफ) मोहम्मद दानिशने सहसचिवपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्याने अभाविपच्या सुमंता साहू याचा पराभव केला. दानीशला ३ हजार २९५ तर साहू याला १ हजार ५०८ मते मिळाली. निकाल जाहीर होताच ‘लाल सलाम’च्या घोषणा देत डाव्या संयुक्त आघाडीने विद्यापीठ परिसर दणाणून सोडला होता. यापूर्वी विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. ती उठविल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आले.