माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या क्षमतेनुसार पाऊल उचलले जात नसल्याचा सरकारवर आरोप केला आहे. देशात रोजगार निर्मितीऐवजी बेरोजगारीत वाढ होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि शहरी अव्यवस्थेमुळे महत्वकांक्षी युवकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. दिल्लीतील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयोजित संमेलनात ते बोलत होते.

ते म्हणाले, कृषी क्षेत्रातील वाढते संकट, रोजगार निर्मितीची कमी संधी, पर्यावरणात होत असलेली घसरण आणि त्याउपर विभाजनकारी शक्ती कार्यरत झाल्यामुळे देशासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. शेतकरी आत्महत्या आणि वारंवार होत असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे आपल्या अर्थव्यवस्थेतील असंतुलन लक्षात येते.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी गंभीरपणे विश्लेषण करणे आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आतापर्यंत जी रोजगारविहिन (रोजगार निर्माण न करणारी) वाढ होती, ती आता बिघडून रोजगाराला नुकसान पोहोचवणारी वाढ (रोजगार घालवणारी) झाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा आणि शहरी अव्यवस्थेमुळे सुखमय भविष्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त रोजगाराची संधी निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी दर अपेक्षेप्रमाणे वाढताना दिसत नाही.

मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, संपत्ती आणि रोजगार वाढीची संधी निर्माण करणारे लघु आणि असंघटित क्षेत्रात नोटाबंदी आणि जीएसटीच्या बेजबाबदारपणे केलेल्या अंमलबजावणीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

वर्ष २००४ ते २०१४ या कालावधीत पंतप्रधान म्हणून काम पाहिलेले सिंग म्हणाले की, आम्ही वेगाने बदलणाऱ्या जगात राहत आहोत. एकीकडे आम्ही वेगाने जगातील अर्थव्यवस्थेशी जोडले जात आहोत आणि जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहोत. तर दुसरीकडे घरगुती स्तरावर आमच्या समक्ष व्यापक आर्थिक आणि सामाजिक आव्हाने उभी राहिली आहेत.