जो बायडेन यांची योजना

अमेरिकेत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत दहा कोटी लोकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येईल, असे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे. देशात सध्या जरी लसीकरण केले जात असले, तरी त्या मोहिमेत बरेचसे अपयश आलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

२० जानेवारीला बायडेन हे सूत्रे हाती घेत असून शुक्रवारी त्यांनी त्यांच्या चमूसमवेत कोविड प्रतिबंधक लसीकरणाविषयी माहिती दिली. डेलावेर येथील विल्मिंग्टन येथून बायडेन यांनी  सांगितले, की अमेरिकेत तूर्त तरी लस वितरण व लसीकरण अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आजच्या बैठकीत आम्ही पाच गोष्टींवर चर्चा केली असून त्यात पहिल्या शंभर दिवसांत १० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे निश्चिात करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठणे सोपे नसले, तरी आम्ही ते साध्य करू. आम्ही राज्यांशी समन्वयाने काम करणार आहोत. लस देण्यासाठी अग्रक्रमाचे गट निश्चिात करणार असून त्याची अंमलबजावणी करणे जिकिरीचे व गोंधळाचे आहे. तुम्ही आज जर लोकांना विचारलेत कुणाला लस देण्यात आली आहे, तर ते सांगू शकणार नाहीत. लशीच्या लाखो मात्रा विनावापराच्या फ्रीजरमध्ये पडून आहेत, एवढेच ते सांगू शकतील.  आम्ही लसीकरणाच्या प्रक्रियेतील सर्व समस्या दूर करणार आहोत. आरोग्य कर्मचारी व इतरांचे लसीकरणही वेगाने केले जाईल.