अफगाणिस्तानचे ऐक्य सरकार (युनिटी गव्हर्नमेंट) तालिबानसोबतची शांतता प्रक्रिया यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी पूर्वनियोजित नसलेल्या भेटीवर रविवारी काबूलला आले.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अबदुल्ला यांची भेट घेऊन केरी हे अफगाण सरकारला व त्याच्या सैन्याला असलेला अमेरिकेचा पाठिंबा अधोरेखित करतील, असे स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते जॉन किरबी म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासून अफगाणिस्तानसोबत घनिष्ठ संबंध राखून असलेले केरी हे तालिबानसोबत शांतता व समेटाच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील संघर्ष संपवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून बहुतांश फौजा परत घेतल्या असून सध्या त्यांचे सुमारे ९८०० सैनिक त्या देशात आहेत. त्यांनी अफगाणिस्तानशी ‘सामरिक भागीदारी करार’ केला आहे.