पाकिस्तानच्या सिंधू परिसरातील तब्बल सहा कोटी नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे. या परिसरातील भूजल साठ्यांमध्ये आर्सेनिक घटकांचे प्रमाण कमालीचे वाढल्याने हे पाणी दुषित झाले आहे. शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, हे दुषित पाणी सेवन केल्यास लोकांचा जीव जाऊ शकतो. सिंधू परिसरातील या धोकादायक ठिकाणांचा नकाशाच शास्त्रज्ञांकडून तयार करण्याता आलाय. हा नकाशा तयार करताना सिंधू परिसरातील तब्बल १२०० ठिकाणच्या जलसाठ्यांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यानंतर आर्सेनिक घटकांचे सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या जलसाठ्यांचे ठिकाण नकाशात नमूद करण्यात आले. येथील बहुतांश ठिकाणी हापसा आणि मोटारच्या सहाय्याने जमिनीतील पाणी वर खेचले जाते. याशिवाय, अन्य नैसर्गिक घटकांचा करता भविष्यात हे प्रदूषण कुठपर्यंत पोहचू शकते, याचाही आढावाही शास्त्रज्ञांनी घेतला आहे. या अंदाजानुसार सध्याच्या घडीला पाच ते सहा कोटी लोकांच्या जीवाला धोका आहे. या पाण्यावर अनेक लोक अवलंबून आहेत. त्यामुळेच ही खूप गंभीर बाब असून या परिसरातील सर्व विहिरींच्या पाण्याची तपासणी होणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

पाण्यात आर्सेनिक घटक असतील तरी पाणी पिताना त्याबद्दल कळत नाही. या आर्सेनिक घटकांना विशिष्ट वास किंवा चव नसते. त्यामुळे अनेकदा अशा दुषित पाण्याचे नकळतपणे सेवन केले जाते. मात्र, सातत्याने अशाप्रकारचे पाणी प्यायल्यास यकृताचा किंवा हदयाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. मात्र, शास्त्रज्ञांनी आतापर्यंत केलेल्या तपासणीत सर्वच जलसाठ्यांमधील पाणी पूर्णपणे दुषित झालेले नाही. काही ठिकाणी पाण्यात आर्सेनिक घटक आढळून आले असले तरी त्यामुळे पाणी दुषित झाले आहे, असे म्हणता येणार नाही.