सौदी अरेबियन पत्रकार आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जमाल खागोशी यांच्या हत्येच्या कटाला सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच परवानगी दिली होती, असं अमेरिकनं गुप्तचर यंत्रणेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. २ ऑक्टोबर रोजी खाशोगी यांची सौदीच्या दूतावासात क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.

पत्रकार जमाल खाशोगी यांची सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली. खाशोगी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. खाशोगी यांच्या हत्येनं जगभर खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी महत्त्वाचा दावा केला आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी पत्रकार जमाल खाशोगी यांना पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी इस्तंबुल, टर्कीमध्ये ऑपरेशन राबवण्यास मंजूरी दिली होती, असं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं अहवालात म्हटलं आहे. खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात आता अमेरिका सौदी नागरिकांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसा इशारा बायडेन प्रशासनानं दिल्याचं वृत्त रॉयटर्सनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिला आहे. व्हिसावर निर्बंध घालण्याची घोषणा अमेरिकडून केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यातून सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना वगळण्यात येणार आहे.

 

खाशोगी यांची हत्या झाल्यानंतर तीन महिन्यांनी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात खाशोगी यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह भरलेल्या सुटकेस घेऊन जात असल्याच दिसत आहे. टर्की येथील टीव्ही चॅनल ‘ए हेबर’ने हा दावा केला होता. तीन माणसं पाच सूटकेस घेऊन जात आहेत. या सूटकेसमध्ये जमाल खशोगी यांच्या मृतदेहाचे तुकडे आहेत, असं या वृत्तवाहिनीने त्यावेळी म्हटलं होतं.

खाशोगी यांची हत्या इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य कचेरीत झाली होती. या हत्येसाठी सौदी अरेबियातून जवळपास डझनभर मंडळी त्या देशाच्या सरकारी विमानातून इस्तंबूलला गेली होती. खाशोगी काही कागदपत्रे मिळवण्यासाठी त्या वेळी दूतावासात गेले होते. तेथून ते जिवंत परत आलेच नाहीत. सुरुवातीस खाशोगी दूतावासातून कुठे गेले ते माहिती नाही, असा पवित्रा सौदी अरेबियाने घेतला होता.

नंतर प्रथम तुर्कस्तान आणि नंतर संयुक्त राष्ट्रांच्या तपास अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर खाशोगी यांची हत्या झाल्याची आणि त्यांच्या शरीराचे दूतावासातच तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची कबुली सौदी अरेबियाला द्यावी लागली. या घटनेविषयीचा संशय राजपुत्र सलमान यांच्याकडे वळल्यानंतर ते काही महिने अज्ञातवासात गेले होते.