‘शारदा चिट फंड’ घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार मोकाट असून सरकार निरपराध्यांना पकडून तुरुंगात डांबत आहे. त्याऐवजी पोलिसांनी आधी त्यांना पकडून शिक्षा द्यावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी शनिवारी येथे केली. दरम्यान, घोष यांना प्रश्न विचारण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने काहीजण जखमी झाले.
घोष यांच्यावर बांगुर चेताविज्ञान संस्थेत वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगाकडे आणले जात होते. इतक्यात काही पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्यासमोर आले; परंतु पोलिसांनी पत्रकारांना तसे करण्यास अटकाव केला. याच वेळी पोलीस आणि पत्रकारांमध्ये संघर्ष उडाला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही पत्रकार जखमी झाले आहेत.
घोष यांनी शुक्रवारी तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘शारदा’ घोटाळ्यातील दोषी व्यक्ती उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. त्यांना पहिल्यांदा अटक करा, असे ‘एसएसकेएम’ रुग्णालयाकडून वैद्यकीय चाचण्यांसाठी बांगूर चेताविज्ञान संस्थेत नेले जात असतान ते पत्रकारांशी बोलत होते. आत्महत्येच्या प्रयत्नात कोठडीतील घोष यांनी शुक्रवारी रात्री प्रमाणाहून अधिक झोपेच्या गोळ्या घेतल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीसाठी शुक्रवारी घोष यांना न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांनी ‘शारदा’ घोटाळ्यातील दोषींना सीबीआयने अटक न केल्यास आपण आत्महत्या करू, अशी धमकी दिली होती. ‘शारदा’ घोटाळा प्रकरणात घोष यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. मात्र या घोटाळ्याच्या तपासाची सूत्रे ‘सीबीआय’आल्यानंतर त्यांना कोठडीत ठेवण्यात आले होते.  घोष हे आपल्या कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न कसे काय करू शकतात, याचा सविस्तर तपशील आपल्याकडे पाठवावा, असा आदेश न्यायालयाने महानिरीक्षकांना (तुरुंग) शनिवारी दिला.
पाहून सांगतो..
कुणाल घोष चेताविज्ञान संस्थेच्या आवारात आल्यानंतर त्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता. कोण्याही पत्रकाराला त्यांच्याजवळ जाण्यास मज्जाव केला. पोलिसांनी काही पत्रकारांना मारहाण केली. हा प्रकार पोलिसांकडून घडला असेल तर मी त्यांच्यावर कारवाई करीन, परंतु नक्की काय घडले, हे मला पाहावे लागेल, असे घटनास्थळी हजर असलेल्या पोलीस उपायुक्त (दक्षिण) मुरलीधर शर्मा यांनी सांगितले.