लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळावरून केंद्र सरकार वाद निर्माण करीत असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मंत्री अंबिका चौधरी यांनी केली आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म बलियातील सिताबदियारा येथे झाला ही वस्तुस्थिती आहे, आता या क्षेत्राला जेपीनगर म्हणून ओळखले जाते, असेही चौधरी म्हणाले.
जयप्रकाश नारायण यांचा जन्म ज्या खोलीत झाला तेथे आता जेपी ट्रस्टचे कार्यालय आहे. जयप्रकाश यांनी तेथे त्यांचे निवासस्थान बांधले होते. जयप्रकाश यांच्या निधनानंतर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्याच ठिकाणी ट्रस्ट स्थापन केला, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. जयप्रकाश नारायण यांच्या स्मृत्यर्थ केंद्र सरकारने देशात कोठेही स्मारक उभारावे त्याचे स्वागतच आहे. मात्र बिहारमधील लाला का तोला हे जयप्रकाश नारायण यांचे जन्मस्थान असल्याचे नमूद करून संभ्रम निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न दुर्दैवी आहेत, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. बिहारमधील निवडणुकीत लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकार जन्मस्थळाचा वाद निर्माण करीत असल्यास ते योग्य नाही. बिहारमधील लाला का तोला हे गाव जन्मस्थळ नाही तर आमचे गाव आहे, असे जयप्रकाश नारायण यांची पुतणी अंजू सिन्हा यांनी सांगितले. जयप्रकाश यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या मातोश्री उत्तर प्रदेशात आल्या होत्या आणि आता ते जयप्रकाशनगर म्हणून ओळखले जाते आणि तेव्हा तेथे प्लेगची साथ मोठय़ा प्रमाणावर पसरली होती. जयप्रकाश ज्या खोलीत जन्मले तेथे सध्या जयप्रकाश नारायण न्यासाची इमारत आहे, असेही त्या म्हणाल्या. लाला का तोला हे कुटुंबीयांचे जुने गाव होते, मात्र लोकनायकांचे स्मारक उभारावयाचे असल्यास ते जयप्रकाशनगरमध्येच हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.