भारत विरोधी भूमिकेसाठी ओळखले जाणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली याचा भारतविरोध हळूहळू कमी होताना दिसत आहे. अलीकडेच के.पी.शर्मा ओली यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग अर्थात रॉ चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर नुकतीच ओली यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली. मात्र या पोस्टमध्ये नेपाळचा जुनाच नकाशा दाखवण्यात आला आहे. या नकाशामध्ये कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या प्रदेशाचा समावेश नाहीय. यावरुन आता विरोधकांना ओली यांच्यावर टीका केली असून नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना नकाशाचा आकार छोटा असल्याने काही भाग दिसत नसल्याचे म्हटले आहे.

बुधवारी रॉ चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी ओली यांची भेट घेतली. त्यानंतर ओली यांची भूमिका अधिक सौम्य होत असल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणेही पुढील महिन्यात नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नेपाळमधील सोशल मीडियावर ओली यांनी शेअर केलेल्या नकाशावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. यानंतरच आता पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

पंतप्रधानांच्या कार्यालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना संबंधित नकाशा हा आकाराने छोटा असल्याने त्यामध्ये सीमेजवळचा काही भाग दिसत नसल्याचे म्हटले आहे. या शुभेच्छा संदेशामध्ये ओली यांनी ट्विट केलेल्या नकाशामध्ये भारतीय सीमेजवळचा लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हा भाग दाखवण्यात आलेला नाही. नेपाळने नुकताच नवीन नकाशा जारी केला असून त्यात हा भारताच्या सीमेतील भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवला होता. मात्र आता पंतप्रधानांच्या शुभेच्छा संदेशात जुनाच नकाशा असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

नेपाळमधील विरोधी पक्षांनाही ओली सरकारवर या प्रकरणावरुन टीका केली आहे. नेपाळी काँग्रेसचे केंद्रीय नेते गगन थापा यांनी ओली स्वत:च्या इच्छेनुसार कोणताही नकाशा वापरु शकतात. मात्र प्रधानमंत्री म्हणून त्यांनी संसदेने संमत केलेला नकाशा वापरणे अपेक्षित आहे, असं म्हटलं आहे. ओली यांनी केलेली पोस्ट ही देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाहीय. नेपाळ सरकारने रविवारी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार तांत्रिक कारणामुळे हा नकाशा स्पष्टपणे दिसत नव्हता असं म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात सकराने चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आलं आहे.

ओली यांचे परराष्ट्र संबंधांसंदर्भातल सल्लागार राजन भट्टाराई यांनी हा नकाशा शेअर करत नेपाळने आपला कालापानी क्षेत्रावरील दावा सोडला आहे असं समजू नये असं म्हटलं आहे. चुकीच्या पद्धतीने या प्रकरणाचा प्रचार केला जात आहे. या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका असंही भट्टाराई यांनी म्हटलं आहे. आम्ही सर्व देशभक्तांना आवाहन करतो की देशाच्या नकाशाबद्दल चालवण्यात येणाऱ्या अशा मोहिमांना बळी पडू नका, असंही भट्टाराई म्हणालेत. नेपाळने 20 मे रोजी जारी केलेल्या नवीन नकाशामध्ये भारतातील उत्तराखंडमधील धारचूला जिल्ह्यातील कालापानी, लिपुलेखा आणि लिंपियाधुरा हे भाग स्वत:च्या नकाशात दाखवले होते. भारताने हा नकाशा फेटाळून लावला आहे. मात्र जूनमध्ये नेपाळच्या संसदेने या नवीन नकाशाला मंजूरी दिली आहे.