अफगाणिस्तानात गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. बुधवारी शोर बाजार येथील गुरु हर राय गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबाचा हात आहे. खरंतर भारतीय दूतावास त्यांचा टार्गेट होता. पण मोठया प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त असल्यामुळे त्यांनी गुरुद्वारावर हल्ला केला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली असली तरी त्यामागे हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबा असल्याचे भारतीय आणि पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये २८ भाविकांचा मृत्यू झाला. आठ जण जखमी झाले. गोळीबार सुरु असताना ८५ जणांची सुटका करण्यात आली. भारतीय दूतावासापासून तीन किलोमीटर अंतरावर हा गुरुद्वारा आहे.

पाकिस्तानच्यावतीने तालिबानच्या क्वेटा शुराने या हल्ल्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानातून भारताला बाहेर काढण्याच्या उद्देश या हल्ल्यामागे होता. पाकिस्तानच्या ISI चा या हल्ल्यामध्ये सहभाग असून त्यांनी ‘ऑपरेशन ब्लॅकस्टार’ नाव दिले होते. पाकिस्तान नेहमीच हक्कानी नेटवर्कचा वापर करत आला आहे. तालिबानचा डेप्युटी कमांडर सिराजुद्दीनकडे हक्कानी नेटवर्कचे नेतृत्व आहे.

एकूण चार दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला. अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी एका दहशतवादाचा खात्मा केला अन्य तिघे पळून गेले. काबूल, जलालाबादमधील दूतावासामध्ये मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त होता. तिथे हल्ला करणे इतके सोपे नव्हते. त्यातुलनेत गुरुद्वारा सॉफ्ट टार्गेट होते असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.