शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना हार्वर्ड विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा मानवतावाद पुरस्कार प्रदान करण्यात आला. बालहक्कांसाठी त्यांनी जो लढा दिला त्यासाठी त्यांना हा पुरस्कार या प्रतिष्ठित विद्यापीठाने जाहीर केला होता. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. सत्यार्थी हे हा पुरस्कार मिळालेले पहिलेच भारतीय आहेत.

विद्यापीठाने म्हटले आहे, की हार्वर्ड मानवतावादी पुरस्कार हा सत्यार्थी यांना त्यांच्या बालगुलामगिरी नष्ट करण्याच्या कामासाठी दिला गेला आहे. सत्यार्थी यांनी मानवी तस्करी व बालकांची गुलामगिरी टाळण्यासाठी व बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी काम केले आहे. सत्यार्थी यांनी सांगितले, की आपण विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत असून, ज्या बालकांच्या लढय़ासाठी आपण काम करतो आहोत त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहोत. जगातील बालगुलामगिरी नष्ट करण्यासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. अगदी अमेरिकेसह विकसित देशातही शेकडो मुलांना कामगार म्हणून वापरले जाते. लैंगिक व्यापारात ओढले जाते. घरकामगार म्हणून काम करवून घेतले जाते. स्थलांतरित लोकांची मुले यात ओढली जातात. यापूर्वी हा पुरस्कार मार्टिन ल्यूथर किंग सीनिअर, कोफी अन्नान, बुट्रोस बुट्रोस घाली, जॅव्हिएर पेरेझ डे क्युएलर, बान की मून, जोस रामोस होर्टा, बिश डेस्मंड टूट, जॉन हय़ूम, एली वेसेल, एथेल केनेडी, आर. सी. गॉर्मन, थोर्बजोर्न जॅगलँड यांना मिळाला आहे.