कलाम यांच्या शेवटच्या पुस्तकातील आठवण
१९८९ मध्ये ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच अचानक दिवंगत माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हॉटलाईनवर दूरध्वनी आला होता व अमेरिका तसेच नाटो राष्ट्रांचा ही चाचणी लांबणीवर टाकण्यासाठी दबाव आहे असे त्यांना सांगण्यात आले होते. ज्यांनी हा दूरध्वनी केला होता ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे तत्कालीन मंत्रिमंडळ सचिव टी. एन. शेषन होते.
कलाम यांनी अखेरची जी पुस्तके लिहिली त्यातील ‘अ‍ॅडव्हान्टेज इंडिया फ्रॉम चॅलेंज टू अपॉरच्युनिटी’ या पुस्तकात ही घटना वर्णन केली आहे.
या पुस्तकात कलाम म्हणतात की, पहाटे तीन वाजता आपल्याला हॉटलाईनवर फोन आला, त्या वेळी अग्नि क्षेपणास्त्राच्या उड्डाणाला अवघे काही तास शिल्लक होते. त्या वेळी अग्नी क्षेपणास्त्राची तयारी कुठपर्यंत आहे असे शेषन यांनी विचारले, त्यांनी मला उत्तराची संधी न देताच चाचणी लांबणीवर टाकण्यासाठी अमेरिका व नाटोचे दडपण आहे असे सांगितले व राजनैतिक मार्गाने दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट केले. पण पुन्हा त्यांनी विचारले, की कलाम, अग्निची स्थिती काय आहे. हार्पर कॉलिन्स इंडिया कंपनीने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
अग्निचे उड्डाण जवळ आले असताना कलाम यांना शेषन यांच्या प्रश्नावर काय बोलावे हे सुचेना. कलाम म्हणतात, त्या वेळी आपले मन अनेक सेकंद हेलकावे खात होते. अमेरिकी उपग्रहांचे या चाचणीवर लक्ष आहे असे गुप्तचरांचे म्हणणे होते. अमेरिकेचे पंतप्रधानांवर दडपण आहे हे माहिती होते, पण त्यातच जेथे चाचणी होणार होती त्या चंडीपूर येथे हवामानही उड्डाणासाठी प्रतिकूल होते. आमच्या चमूने खूप कष्ट घेतले होते, तरुण महिला- पुरूष वैज्ञानिकांनी दहा वर्षे परिश्रम केले होते. आपल्याला तंत्रज्ञान नाकारल्यानंतर आम्ही हे सगळे करून दाखवले होते. अनेकदा माध्यमांचा दबावही होता, काहीवेळा प्रकल्पांसाठीच्या उपकरणांअभावी अडचण होती या स्थितीत आम्ही अग्नीची चाचणी सज्जतेस आणली होती. शेषन यांच्या त्या प्रश्नावर शेवटी आपण जरा घसा खाकरला व सांगितले की, सर .. तुम्ही सांगता ते सगळे ठीक आहे पण अग्नी आता परतीच्या मार्गावर नाही.
आपण चाचणी मागे घेऊ शकत नाही, आता खूप उशीर झालाय. आता शेषन फोनवर वाद घालणार व शाब्दिक चकमक होणार हे अपेक्षित धरून चाललो होतो, संस्थेतील वरिष्ठही आपल्याला धारेवर धरणार असे वाटत होते पण आश्चर्य म्हणजे सकाळचे चार वाजत आले असताना, पुन्हा शेषन यांचा फोन आला व त्यांनी ठीक आहे, असे सांगितले व पुन्हा एक विराम घेऊन चाचणी ठरल्याप्रमाणे करा असे स्पष्ट केले. त्यानंतर तीन तासांनी अग्नीची चाचणी २२ मे १९८९ रोजी अचूकपणे झाली. पण ती चाचणी केवळ अग्नीची नव्हती तर अनेक तरुण संशोधकांच्या आशा आकांक्षा त्यात होत्या.
जगातील कुठलीही शक्ती आपल्याला अडवू शकत नाही ही भावना त्यांच्यात निर्माण झाली. आम्ही इतिहास घडवला होता. दुसऱ्या दिवशी चंडीपूरला चाचणीच्या ठिकाणी वादळाने नुकसान झाले, पण अग्नीची लढाई आम्ही आधीच जिंकली होती.