सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून जेएनयूतील विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनं थेट मोदी सरकारला आव्हान दिलं आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात कन्हैया कुमारनं बिहार बंदची हाक दिली होती. यावेळी झालेल्या रॅलीत “तुम्ही (सरकार) आम्हाला देशाचे नागरिक समजत नसाल, तर आम्ही तुम्हाला सरकार म्हणून ग्राह्य धरणार नाही,” असा इशारा कन्हैयानं मोदी सरकारला दिला आहे.

सुधारित नागरिकत्व आणि एनआरसी कायद्याविरोधात सोमवारी बिहार बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी पुर्णियामध्ये आयोजित रॅलीत कन्हैया कुमार सहभागी झाला होता. यावेळी बोलताना कन्हैया कुमार म्हणाला, “शांततापूर्ण मार्गानं आणि ठामपणे विरोध करत रहा, असं आवाहन त्यानं विद्यार्थ्यांना केलं.

मोदी सरकारवर टीका करता कन्हैया म्हणाला, “तुम्ही आम्हाला नागरिक मानत नसाल, तर आम्ही तुम्हाला सरकार समजणार नाही. तुमच्याकडे संसदेमध्ये बहुमत आहे. पण, आमच्याकडे रस्त्यावरचे बहुमत आहे. ही लढाई हिंदू किंवा मुस्लिमांविषयी नाही. आम्हाला सावरकरांचा देश नकोय आम्हाला भगतसिंह आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देश हवा आहे. त्यांची इच्छा आहे की अश्फाक आणि बिस्मिल यांनी भांडत राहावं पण, आम्ही तस घडू देणार नाही,” असं कन्हैया म्हणाला.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लीम विद्यापीठात झालेल्या पोलीस कारवाईविषयी बोलताना कन्हैया म्हणाला, “जेव्हा पोलीस विद्यार्थ्यांवर अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडतात, तेव्हा देशभरातील विद्यार्थ्यांनी एकजूट राहण्याची गरज आहे. शांततेच्या मार्गानं आंदोलन करून एनआरसीची देशाला गरज नाही, हे सरकारला सांगा, असं आवाहनही त्यानं केलं.

“संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे. आपल्या प्रज्ञा ठाकूरचा भारत नकोय. लोकांना आता एनआरसीपासून आझादी हवी आहे. लोकांना भाजपापासून आझादी हवी आहे. लोकांना आरएसएस पासून आझादी हवी आहे,” असंही कन्हैया यावेळी म्हणाला.