पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक औद्योगिक भारताचा पाया घातला, असे उत्तर काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या आजोबांना उद्देशून केलेल्या टीकेवर दिले आहे. मोदी यांनी छत्तीसगड येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीका करताना असे म्हटले होते की, भारतात राहुलच्या नाना-नानीने पाण्याच्या पाइपलाइन तरी टाकल्या होत्या का?

मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सिब्बल म्हणाले की, भाजपने ब्रिटिश वसाहतवादी राजवटीशी हातमिळवणी केली होती. तुम्ही जेव्हा तरूण होतात  तेव्हा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाणी कुठून मिळत होते असा सवालही त्यांनी केला. नेहरूंनीच आधुनिक औद्योगिक भारताचा पाया घातला, पण तुमच्या नाना-नानी व दादा -दादींनी ब्रिटिश वसाहतवाद्यांशी हातमिळवणी केली होती हे विसरू नका. १९४२ च्या छोडो भारत चळवळीत भाजपने ब्रिटिशांची साथ दिली. त्यांच्या दादा-दादी व नाना-नानी यांचे हे वर्तन होते. मोदी यांना त्यांच्या दादा- दादींविषयी काही माहिती नाही.

सिब्बल यांनी अलीकडे राफेल करारावर टीका करताना असे म्हटले होते की, हा करार सरकार-सरकार यांच्या दरम्यानचा नाही. यापूर्वीही फ्रान्स सरकारने या पातळीवर कधीच संरक्षण करार केलेले नाहीत. अमेरिकेत परकीय लष्करी विक्री अंतर्गत करार करावे लागतात तसे फ्रान्समध्ये नाही. विमानांचा दर्जा व विमाने तयार करण्यासाठी लागणारे मनुष्यतास याची हमी देण्यास नकार दिल्यानंतर दसॉल्ट कंपनीशी करार करायला नको होता.