Kargil Vijay Diwas २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांच्या हृदयावर अभिमानाने कोरला गेलेला दिवस आहे. कारण याच दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. सुमारे अडीच महिने चाललेल्या या ‘ऑपरेशन विजय’मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. आज संपूर्ण देशभरात कारगील विजय दिवस साजरा केला जात असून शहिदांना आदरांजली वाहिली जात आहे. लष्कर, हवाई आणि नौदलाच्या प्रमुखांनी देखील शहिदांना आदरांजली वाहिली.

यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कारगील विजय दिवसच्या निमित्ताने पाकिस्तानला काय संदेश देणार असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “पुन्हा असं करु नका. आगळीक एकदा केल्यानंतर सहसा पुन्हा कोणी पुनरावृत्ती करत नाही. पुढच्यावेळी चुकीला माफी नाही”.

यावेली बिपीन रावत यांनी देशवासियांना अजिबात चिंता न करण्याचा सल्ला दिला, त्यांनी म्हटलं की, “मी देशवासियांना सांगू इच्छितो की त्यांनी अजिबात चिंता करु नये. सुरक्षा दलांना दिलेली जबाबदारी कितीही कठीण असली तर ती पूर्ण केली जाईल. आमचे जवान सीमारेषेची सुरक्षा करत आहेत”. यावेळी त्यांनी ताफ्यात आधुनिक शस्त्रांचा समावेश केला जात असल्याचंही सांगितलं.

याआधीही गुरुवारी बोलताना बिपीन रावत यांनी पाकिस्तान पुन्हा असा बालिशपणा करेल असं वाटत नसल्याचं म्हटलं होतं. त्यांनी आता आपली ताकद कळली आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. आता आपल्याकडे आधुनिक साधनं उपलब्ध असून घुसखोरी करणाऱ्यांची माहिती मिळवू शकतो अशी माहिती त्यांनी दिली होती.