बेळगावमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारे ७ कोटींच्या बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरातील सदाशिव नगरमधील पीडब्ल्यूडी वसाहतीतील एका घरातून हा साठा जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुरूवातीला पोलिसांना या खऱ्या नोटा असल्याचे वाटले होते. परंतु, नंतर या बनावट नोटा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अजित निडोनी (रा. मूळ विजयपूर, कर्नाटक) असे या व्यक्तीचे नाव आहे. यापूर्वीही बनावट नोटाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदाशिव नगरमधील पीडल्ब्यूडी वसाहतीतील मंजुनाथ बागलकोटी यांच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यावेळी त्यांच्या घरात ५०० व २००० रूपयांच्या नोटा आढळून आल्या. या नोटा निवडणुकीत वाटपासाठी आणल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी अजित निडोनीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. नोटांचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे मंगळवारपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. दि. १२ मे रोजी कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.