कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे काही आमदार विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. कर्नाटक भाजपामधील काही आमदारांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आतापर्यंत तरी हायकमांड मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बाजूने आहे. येडियुरप्पा यांना अन्य कुठला पर्याय असू शकत नाही असे हायकमांडचे मत आहे. पण जे आमदार भेटले व फोनवरुन चर्चा केली, त्यांच्यामध्ये बासनगौडा पाटील  आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

करोना व्हायरसच्या या संकटकाळात येडियुरप्पा यांनी आपल्या आमदारांबरोबर कुठलीही चर्चा केलेली नाही तसेच आमदारांच्या मतदारसंघात काय सुरु आहे याची सुद्धा त्यांना अजिबात चिंता नाही असे आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत, असे आमदारांना वाटते. वयोमानामुळे येडियुरप्पा यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झालाय असे आमदारांचे मत आहे.

आमदारांकडून समोर आलेले नाव बासनगौडा पाटील हे सुद्धा लिंगायत समाजाशी संबंधित आहेत. एक वेळ विधानपरिषदेवर आणि तीन वेळ आमदार राहिलेले बासनगौडा पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवले आहे. उत्तर कर्नाटकातील वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जवळपास ४० आमदार बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव हाय़कमांडला सुचवायला तयार आहेत. मागच्या काही दिवसात २५ आमदार वेगवेगळया ठिकाणी भेटले व ६० आमदार फोनवरुन परस्परांच्या संपर्कात होते.