केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. येडियुरप्पा हे करोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करुन मला करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती.

“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा यांनी लॉकडाउनसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत. ‘काहीही झाले तरी, आता पुन्हा लॉकडाउन करणार नाही’ असा निर्धार येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता. “करोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, पण आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही. अर्थसंकल्पात मी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या भविष्यात पूर्ण करेन. गरज पडली, तर कर्ज काढून सर्व प्रकल्प पूर्ण करेन” असे येडियुरप्पा म्हणाले होते.

नक्की वाचा >> “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली,” येडियुरप्पांनी केलं ट्विट; सुप्रिया सुळेंनी दिला रिप्लाय, म्हणाल्या…

अमित शाह यांनाही लागण

आज दुपारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

“करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी,” असं शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

करोनाची लागण झालेले दुसरे मुख्यमंत्री

येडियुरप्पा हे करोनाची लागण झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. या पूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्याला करोनाचा लागण झाल्याचे ट्विटवरुन सांगितलं होतं. “माझ्यात करोनाची लक्षणं दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांची करोना टेस्ट करुन घ्यावी, तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्यावे” असे आवाहन शिवराज सिंह चौहान यांनी  ट्विटवरुन केलं होतं. सध्या शिवराज यांच्यावरही उपचार सुरु आहेत.