राज्यपालांच्या आदेशाविरोधात कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात

बंगळूरु : कर्नाटकमधील राजकीय नाटय़ शुक्रवारीही संपुष्टात न आल्याने ते आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने सायंकाळी सहा वाजेपर्यंतही बहुमत सिद्ध केले नाही. विश्वासदर्शक ठरावावर आपण सोमवारी उत्तर देणार असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

यापूर्वी राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना दोनदा पत्र पाठवून शुक्रवारी सायंकाळपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली होती. त्यापूर्वी दुपारी दीड वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सायंकाळीही बहुमत सिद्ध करण्यात आले नाही, त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय नाटय़ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर वजुभाई वाला हे केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाकडे येथील परिस्थितीबाबत पत्र पाठविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा कशा प्रकारे घ्यावी याबाबत राज्यपाल विधानसभेला आदेश देऊ शकत नाहीत, असे कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेंल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपालांनी दोनदा मुदत दिली, त्यावरच कुमारस्वामी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्तारूढ पक्षाच्या १५ बंडखोर आमदारांवर सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याची सक्ती करता येऊ शकत नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता. त्याबाबतही कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

चर्चा सोमवारी.. काँग्रेस-जेडीएसचे आमदार आणि कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावावर चर्चा करण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी ही चर्चा सोमवारी घेण्याचे जाहीर केले.  रमेशकुमार यांनी विधिमंत्री कृष्णा बायरेगौडा आणि कुमारस्वामी व सभागृहातील सदस्यांशी चर्चा केल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया सोमवारी पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे, असेही सांगितले.