कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफ केल्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे १ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असून याबाबतची सविस्तर माहिती येत्या एक ते दोन दिवसात दिली जाईल, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये भाजपाने जाहीरनाम्यामध्येच शेतकरी कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेवर येताच येडियुरप्पा यांनी जाहिरनाम्यामधील पहिले आश्वासन पूर्ण केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे एक लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अर्थतज्ज्ञांनी यावर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून याऐवजी सरकारने शेतकरी सक्षम कसा होईल, यावर भर दिला पाहिजे, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कर्नाटकमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या असून एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत कर्नाटकमध्ये ३५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी नापिकी आणि दुष्काळ यामुळे आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी काँग्रेस सरकारनेही कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.