कर्नाटकातील मद्दुर तालुक्यात दीड वर्षांच्या चिमुरड्याचा कुकरची शिट्टी गिळल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. भुवन असे या चिमुरड्याचे नाव आहे.

मद्दुर तालुक्यातील नागरकेरे या गावात राहणारा भुवन शनिवारी संध्याकाळी त्याची आजी पुतलिंगम्मा यांच्यासोबत होता. त्याची आजी भात आणि सांबार कालवत होती. पुतलिंगम्मा यांनी कुकरचे झाकण खालीच ठेवले होते. दीड वर्षांचा भुवन खेळता खेळता तिथे पोहोचला आणि त्याने कुकरची शिट्टी गिळली. पुतलिंगम्मा यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शिट्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिट्टी घशात अडकल्याने ती काढता येत नव्हती. शेवटी कुटुंबियांनी भुवनला मद्दुरमधील एका रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्या अन्ननलिकेत अडकलेली शिट्टी बाहेर काढली. मात्र, भुवनला श्वास घेताना त्रास होत असल्याने त्याला मैसूरमधील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना भुवनचा मृत्यू झाला.

भुवनचे आई – वडील उडूपी जिल्ह्यातील सर्वेक्षण विभागात कार्यरत असून त्यांनी मुलाला आजी- आजोबांकडे ठेवले होते. त्या वृद्ध दाम्पत्याचे गावात एक दुकान आहे. मुलाचा मृत्यूची बातमी समजताच ते दोघेही गावी परतले असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.