कर्तारपूरमधील ऐतिहासिक शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी पाकिस्तानने दररोज भारतातील पाच हजार यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी भारताने गुरुवारी केली.

पंजाबच्या गुरदासपूरमधून सीमेपलीकडे असलेल्या कर्तारपूर साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गिका खुली करण्याबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली, तेव्हा भारताने वरील मागणी केली. सुरुवातीला किमान पाच हजार भारतीय यात्रेकरूंना दररोज शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आपल्या बाजूने करण्यात आल्याचे गृहविभागाचे सहसचिव एससीएल दास यांनी सांगितले.

पुलवामात करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्याला दिलेले चोख प्रत्युत्तर यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या शिष्टमंडळांमध्ये ही पहिलीच बैठक झाली.

भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांना पाकिस्तानातील शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी देण्यात यावी अशी भारताची मागणी आहे. आठवडाभर एकही सुटी न घेता म्हणजेच दररोज यात्रेकरूंना प्रार्थनास्थळाला भेट देण्याची अनुमती द्यावी, अशी आग्रही मागणी भारताने केली आहे, असे दास यांनी बैठकीनंतर सांगितले.

सदर मार्गिका व्हिसामुक्त असावी, दस्तऐवज अथवा प्रचलित पद्धत यांचा कोणताही अडसर मार्गात असू नये, यावर भारताने भर दिला. सीमेपलीकडे ज्या यात्रेकरूंना प्रार्थनास्थळी पायी जाण्याची इच्छा आहे त्यांना तशी परवानगी द्यावी, अशी मागणीही भारताने केली आहे. कर्तारपूर मार्गिका खुली करण्याबाबतची पद्धत कशी असावी, याबाबत भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रथम झालेली चर्चा सलोख्याच्या वातावरणात पार पडल्याचे एका निवेदनामध्ये म्हटले आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व दास यांनी केले तर पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आशिया आणि सार्कचे महासंचालक मोहम्मद फैझल यांनी केले.