काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनात चार जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनाच्या घटनांमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. बांदीपोरामधील गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या दोन घटना घडल्या. १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर झालेल्या या हिमस्खलनामुळे चार जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराची हेलिकॉप्टर्स आणि बचाव पथकाकडून त्या जवानांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आलं होतं. Another Army person lost his life after an Army patrol was hit by a blizzard in Gurez Sector of Jammu and Kashmir, yesterday. — ANI (@ANI) December 4, 2019 यापूर्वी दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८,००० फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर पहाटे हिम कडा कोसळ्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले होते. गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरचा वापर केला होता. १८ नोव्हेंबर रोजीदेखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाच्या तावडीत सापडले होते. यामध्ये चार जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गस्ती पथकातील ८ जवान आणि पोर्टर बेपत्ता झाले होते. सियाचीन ग्लेशिअर ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी आहे.