काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याची तयारी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली आहे. ‘‘काश्मीर प्रश्नात मी मदत करू शकतो. मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्यास मला आवडेल’’, असे ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगितले. इम्रान खान यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. त्या वेळी उभयतांमध्ये काश्मीरबाबत चर्चा झाली. काश्मीरवरून भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे, असे सांगत ट्रम्प यांनी या प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे यावेळी सांगितले.