बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांचे उद्या भारतात लँडिंग होईल. फ्रान्स बरोबर करार केल्यानंतर चार वर्षांनी राफेलची पाच विमानांची पहिली तुकडी उद्या भारतात येईल. या संपूर्ण प्रक्रियेत एअर कॉमरेड हिलाल अहमद रथर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. काल राफेल विमानांनी भारतात येण्यासाठी फ्रान्समधून उड्डाण केले. त्यावेळी हवाई तळावर फ्रान्समधील भारताच्या राजदूतांसोबत हिलाल अहमद रथर तिथे होते.

ते मूळचे दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बख्शियाबादचे आहेत. त्याचे सैनिकी शाळेमध्ये शिक्षण झाले आहे. १९८८ साली ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत रुजू झाले. फ्लाइट लेफ्टनंट पदावरुन ते आज एअर कॉमरेड पदापर्यंत पोहोचले आहेत. फ्रान्समध्ये हिलाल अहमद रथर एअर अटॅची म्हणून तैनात होते.

भारताच्या गरजेनुसार राफेलमध्ये शस्त्रास्त्र बसवून जलदगतीने ही  विमाने भारताला मिळवून देण्याची  महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. ऑनलाइन उपलब्ध रेकॉर्डनुसार, हिलाल अहमद रथर यांच्याजवळ मिग-२१, मिराज-२००० आणि किरण विमान उड्डाणाचा तीन हजार तासांचा अनुभव आहे. त्यांना २०१० साली वायू सेवा मेडल आणि २०१६ मध्ये विशिष्ट सेवा मेडल या पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. राफेल विमाने काल फ्रान्समधून भारताच्या दिशेने झेपावली. उद्या अंबाला एअरबेसवर या विमानांचे लँडिंग होईल.