उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दोन काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भगवे कपडे परिधान केलेल्या दोघांनी भररस्त्यात ही मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तुम्ही काश्मीरमधून आला आहात म्हणून मारहाण करत असल्याचं व्हिडीओत बोलताना ऐकू येत आहे. यावेळी तेथील काही लोकांनी मध्यस्थी करत विक्रेत्यांची सुटका केली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

विक्रेते रस्त्यावर ड्राय फ्रूट विकण्यासाठी बसले असता भगवे कपडे परिधान केलेले दोघेजण अचानक येऊन मारहाण करण्यास सुरुवात करतात. एक हल्लेखोर तर अक्षरक्ष काठीने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी आरोपी त्यांच्याकडे आधार कार्डदेखील मागतात. येथून लगेच निघून जायचं अशी धमकीही देण्यात आली. याचवेळी काही लोक तिथे येतात आणि मारहाणीचं कारण विचारु लागतात. यावर मारहाण करणारा व्यक्ती हे काश्मीरचे आहेत म्हणून मारहाण करत आहोत असं उत्तर देतो.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली. अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव बजरंग सोनकर असून गुन्हेगारी पार्श्वभूमीक आहे. त्याच्याविरोधात 12 गुन्हे दाखल असून हत्येच्या गुन्ह्यातही आरोपी आहे.

काश्मिरी नागरिकांना मारहाण होत असल्याची ही पहिली घटना नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरी नागरिकांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.