17 September 2019

News Flash

कठुआ बलात्कार प्रकरणातील एका आरोपीवर प्रौढाप्रमाणे चालणार खटला

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी परवेश कुमार उर्फ मन्नूवर यापुढे प्रौढ गुन्हेगारांसारखा खटला चालणार आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी परवेश कुमार उर्फ मन्नूवर यापुढे प्रौढ गुन्हेगारासारखा खटला चालणार आहे. परवेश कुमारने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले होते. वैद्यकीय चाचणीत त्याचे वय १९ ते २३ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यापुढे परवेश कुमार विरोधात अन्य सात आरोपींप्रमाणे खटला चालणार आहे.

गुरुवारी पठाणकोट जिल्हा आणि सत्र न्यायालयाने परवेश कुमारचा वैद्यकीय अहवाल स्वीकारला. बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. हायकोर्ट त्याच्या वयासंबंधी पुढील निर्णय देईपर्यंत परवेश कुमारला अन्य सात आरोपींबरोबर न्यायालयात हजर केले जाईल.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर या घटनेची भीषणता समोर आली व संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती. सर्वसामान्यांसह समाजातील अनेक सेलिब्रिटींनी पुढे येऊन निषेध केला होता. आरोपींनी आठ वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार केले.

मंदिराच्या परिसरात या मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारापूर्वी एका नराधमाने धार्मिक विधी केल्या. तर या प्रकऱणातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने साथीदारांना मुलीची हत्येसाठी काही वेळ थांबा. मलाही तिच्यावर अत्याचार करायचे आहे, असे सांगितले होते, अशी माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी समोर आली होती. निवृत्त सरकारी अधिकारी संजी राम हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. संजी रामनेच बलात्कार आणि हत्येचा कट रचला. संजी रामने त्याच्या पुतण्याला मुलीचे अपहरण करायला सांगितले. पीडित मुलगी नेहमीच जंगलात चारा घेण्यासाठी यायची. १० जानेवारीला पीडित मुलगी चारा शोधत असताना रामच्या अल्पवयीन पुतण्याने तिला गाठले. त्याने पीडित मुलीला गप्पाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचा साथीदार मन्नूनेही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ते पीडित मुलीला एका मंदिराच्या आवारात घेऊन गेले. तेथील प्रार्थनाकक्षात पीडितेला डांबून ठेवण्यात आले होते.

First Published on July 6, 2018 3:03 am

Web Title: kathua gang rape murder
टॅग Murder