दिल्लीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या आठवणी अजूनही नरेंद्र मोदींना सतावत आहेत. त्यामुळे माझं नाव ऐकलं की मोदींचं रक्त खवळतं. मोदी जितके दिवस देशाबाहेर असतात तितके दिवस दिल्लीचा कारभार नीट चालतो, अशा खोचक शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आल्याप्रकरणी केजरीवाल यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदी म्हणायचे की , ना खाऊंगा, ना खाने दुंगा, मात्र आता ते सगळे संपले आहे. मात्र, आता त्यांचा पवित्रा ना काम करूंगा, ना काम करने दुंगा, असा असल्याचेही केजरीवालांनी सांगितले.
केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या बँक खात्यात छाप्यादरम्यान २७ लाख रूपये मिळाल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांचे मासिक वेतन दीड ते दोन लाख रूपयांच्या घरात असल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात इतके पैसे असण्यात काहीही वावगे नाही. याऊलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला चहावाला म्हणवतात. तेव्हा एका चहावाल्याकडे दहा लाखांचा सूट कसा आला, असा कोणता चहा त्यांनी विकला, असे सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले. ते मंगळवारी दिल्ली विधानसभेतील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी सीबीआयचा गैरवापर केल्याप्रकरणी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.